गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

वेळ अमावस्या

 

वेळ अमावस्या


वेळ अमावस्या शेतातील पूजा

ग्रामीण कृषी संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणजे वेळ अमावस्या किंवा येळ आवस (ईळआवस). कर्नाटक, मराठवाडा, सोलापूर या भागामध्ये विशेषतः हा सण साजरा केला जातो. भारतातील सण हे कोणत्या या कोणत्या स्वरूपात आपले नाते कृषी संस्कृतीशी सांगण्याचा प्रयत्न करतात. निसर्गपूजा, प्राणिपूजा यामाध्यमातून हे सर्व जतन केले गेले आहे. वेळ अमावस्या हा सुद्धा त्यापैकीच एक सण.  मार्गशीर्ष अमावस्या या दिवशी हा सण साजरा केला जातो.


या दिवशी  सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला जातो या सणासाठी लागणाऱ्या गोष्टी जसे कि अनेक भाज्या एकत्र करून एक भाजी बनवली जाते तिला भज्जी म्हणले जाते.  त्यासोबतच बाजरीचे उंडे, शेंगाच्या पोळ्या, शेंगदाण्याचे लाडू, आंबील ई. बनवून शेतात नेले जाते विशेषतः: ज्वारी पेरलेले शेत निवडले जाते (बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचे हिस्से मिळालेले असतात अशा वेळी ज्या शेतात ज्वारीचे पीक आहे ते शेत निवडले जाते.)  त्यानंतर ५-७ दगड स्वच्छ पाण्याने धुवून त्याला चुन्याने रंगवले जाते. याना पाच पांडव व द्रौपदी व कुंती असे पाच किंवा सात दगड पुजले जातात. त्यांना नवीन आलेल्या ज्वारीच्या ५ ताटाचे मंडप बनवले जाते व झाडाखाली हे सर्व पुजले जाते. त्यासमोर ज्वारीच्या पाने अंथरून त्यावरती पूजा मांडली जाते. सर्वात अगोदर ज्वारीच्या पिठाचे दिवे बनवले जातात व ते पुढे मांडले जातात. त्यापुढे बाजरीचे उंडे त्यावरती भात व भज्जी ठेवली जातात. शेंगदाण्याच्या पोळ्या व लाडू मांडले जातात. काही शेतकरी पाच फळे व केळीची फणी मांडतात.  घरून निघताना एक मातीच्या घागरीमध्ये आंबील घेतलेली असते ती ठेवली नैवेद्यात जाते. शेतात पुजण्यासाठी मोरवा[1] आणलेला असतो तो पूजेत ठेवला जातो. त्याच्यावरती चुन्याने रंगविलेले असते.पूजा संपल्यानंतर पंगत बसते. जेवण हे झाकणीमध्ये[2] वाढले जाते. मित्र परिवार व पाहुणे रावळे याना आमंत्रण दिलेले असते. त्या दिवशी जेवलेले ताट (झाकणी ) स्वतःच धुऊन ठेवली जाते. घरातील स्त्री हि लक्ष्मीचे रूप मानले जात असल्याने व शेतातही धन धान्याच्या रूपात लक्ष्मी उभी असल्याने ज्याचे ताट त्यालाच धुवायला लावले जाते.

संध्याकाळी काही शेतकरी हे आवसपाट्या घेऊन येतात. त्या गावाबाहेरील मारुती मंदिरात ठेवल्या जातात व नंतर हर हर महादेवच्या गजरात घरी नेल्या जातात.

 

 

 

 






[1] मोरवा : मोरवा म्हणजे मातीचे लहान घागरीसारखेच परंतु घागरीपेक्षा लहान भांडे

[2] झाकणी : मोरव्या वरती झाकण म्हणून याचा उपयोग केला जातो. हेही माती पासूनच बनवलेले असते.

वेळ अमावस्या

  वेळ अमावस्या वेळ   अमावस्या   शेतातील   पूजा ग्रामीण कृषी संस्कृतीतील एक महत्वाचा सण...