शुक्रवार, ७ जून, २०२४

नागपंचमी व गौराई

 


वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।

ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥

 (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक असे अनेक नाग आपणाला हिंदू धर्मग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. भागवत पुराणातही तक्षक नागाचा उल्लेख आलेला आहे.

भारतातातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये व भारतातील असणाऱ्या हिंदू, जैन, बौद्ध इत्यादी सर्व धर्म ग्रंथामध्ये नागांचा उल्लेख आलेला आढळतो. हिंदू धर्मामध्ये नागांना क्षेत्रपाल[1] म्हणून मानले गेले आहे. हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ समजल्या जाणाऱ्या महाभारत यामध्येही नागांचा उल्लेख आढळतो. बौद्ध साहित्यातही नागांचा उल्लेख आढळतो. अनेक बुद्ध मूर्तीसोबत नागांची प्रतिकृती आपणाला पाहावयास मिळते.जैन धर्मामध्येही नागांचा उल्लेख आढळतो.

 ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया मर्दन करून सुखरूप बाहेर आले तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमी म्हणून त्याच दिवसापासून नागपंचमीच्या सणाला सुरवात झाली अशी एक आख्यायिका सांगलीतली जाते.[2]

कृषी संस्कृतीतील नागपंचमीचा हा सण कासेगावमध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी गावातील सर्व महिला आपल्या भावासाठी उपवास धरतात. नागपंचमीच्या सणालाच आणखी एक महत्वाची लहान थोर सगळ्यांना आवडणारी गोष्ट केली जाते ती म्हणजे झोका. या दिवशी गावात अनेक लोक लहान मुलासाठी व महिलांना खेळण्यासाठी झोका बांधतात.

नागपंचमी दिवशी सकाळी महादेव मंदिराचा पुजारी असणारे गुरव गावातील कुंभाराच्या घरी जातात व तेथून चिखलमातीचा बनवलेला नागोबा आणून मठाच्या चौकातील मारुती मंदिरात ठेवला जातो. दिवसभर थेथे गावातील सर्व भाविक त्याच्या पूजेसाठी येतात व त्याला भक्तिभावाने नैवद्य दाखवतात. नैवेद्यामध्ये पुरणपोळी, व पुरणाचेच कानवले (करंजी), दूध, लाह्या याचा नैवद्य दाखवला जातो. या दिवशी तेलामध्ये तळलेले पदार्थ निषिद्ध मानले जातात. त्यामुळे पुरणाचे कानवले (करंज्या) या शिजवलेल्या असतात. संध्याकाळी वाजत गाजत तो नागोबा गावातील पाटील वाड्यात नेऊन ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी गावातील पाटील, वाणी चौगुले, सोनार (वेदपाठक), म्हैत्रे व चौगुले यांच्या घरी गौरी बनविल्या जातात संद्याकाळी चार नंतर त्या सर्व गौरी वाजत गाजत मठाच्या चौकात आणल्या जातात. गावातील महिला फेर धरतात व गाणी म्हणतात. संध्याकाळी विठ्ठल मंदिराजवळील बारव मध्ये त्यांचे विसर्जन केले जाते.

कृषी संस्कृतीमध्ये नागांना विशेष महत्व दिलेले आढळते. शेतातील धान्याचे रक्षण नागदेवता करतात असे समजले जाते. काही ठिकाणी नागांना पाण्याशी संबंधित हि मानले गेले आहे.[3]

कासेगाव मध्ये नागपंचमी सोबतच नागोबा भंडारा उत्सवही केला जातो. चैत्र महिन्यातील अमावास्येला नागोबा गल्ली मध्ये असणाऱ्या नागोबा जवळ हा उत्सव केला जातो. गावातील भाविक भक्ताकडून गहू, तांदूळ, ई. प्रकारचे धान्य गोळा करून त्यापासून लापशी[4] केली जाते व संद्याकाळच्या सुमारास हि बाळ गोपाळामध्ये प्रसाद म्हणून वाटली जाते. अलीकडील काळात लापशी ऐवजी डाळ भात प्रसाद म्हणून केला जातो.



[1] क्षेत्रपाल : एखाद्या क्षेत्राचे रक्षण करणारे / पालन करणारे

[2] https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80#cite_note-19

[3] https://en.wikipedia.org/wiki/N%C4%81ga

[4] लापशी : गव्हापासून गूळ मिसळून खिरीसारखाच केला जाणारा पदार्थ


वेळ अमावस्या

  वेळ अमावस्या वेळ   अमावस्या   शेतातील   पूजा ग्रामीण कृषी संस्कृतीतील एक महत्वाचा सण...